आषाढी वारीसाठी सासवड पालखी तळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
पुणे, ता. २५ - आषाढी वारीमध्ये सोहळ्यात सासवड पालखी तळ येथे वारकऱ्यांची चोख व्यवस्था व्हावी यासाठी प्रशासनाने सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकतीच पालखीतळाची पाहणी केली. सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वीज, पाणी, आरोग्य आणि रस्त्यांची कामे याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.
यावेळी सासवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आनंदी जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक कुमार कदम, तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे, नगरसेवक राजन जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर जगताप, अर्चना जगताप व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ व कमिटीने सासवड नगरपरिषदेला सूचना केल्या.
सूचना पुढीलप्रमाणे...
यंदा सोहळा जुलैमध्ये असल्याने पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे शासनाने वारकऱ्यांसाठी गतवर्षीपेक्षा दुप्पट निवारा व्यवस्था उभारावी.
- चंदन टेकडी ते सासवड पालखी तळापर्यंत आवश्यक ठिकाणी वीज व्यवस्था करावी.
- फुरसुंगी ते दिवे घाट रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. महामार्गावर पुरेसा प्रकाश असावा आणि मुक्कामाहून पालखी प्रस्थान करताना वाहनांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- वीर फाटा ते बोरावके मळा पालखी विसावा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावा.
- सेवा रस्त्यावर अडथळा ठरणारे विजेचे खांब तातडीने हलवावेत.