विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबल्या.....
पिंपरी, ता. १५ - उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आज, सोमवारी (ता. १५ जून) शाळा सुरु झाल्या. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबल्या. खासगी आणि महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये शिक्षकांनी-शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांची देखणी सजावट करण्यात आली होती. विद्येची देवता सरस्वती पूजनाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मोठ्या कालावधीनंतर मित्रमैत्रिणी भेटल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. प्रत्येकाने सुट्टीत काय केले..... हे एकमेकांना सांगण्यात सगळे रमून गेले होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी असंख्य पालक मुलांना शाळेत सोडण्यासाठी आले होते. अनेक विद्यार्थी स्कूल बसने शाळेत आले होते. काही लहान मुलांना शाळेत जायचा कंटाळा आला होता पण मित्रमैत्रिणी भेटल्यावर त्यांचा कंटाळा कुठल्याकुठे पळून गेला. सर्वांनी शाळेच्या पहिल्या दिवशी मित्रमैत्रिणींसोबत जेवणाचा आनंद घेतला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सव’साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
महापौर रवी लांडगे यांनी भोसरी, इंद्रायणीनगर येथील महपालिकेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थी व पालकांशी मनमोकळा संवाद साधला. महापौरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पालकांना महापालिकेच्या शाळेतील राबवण्यात येणाऱ्या नव्या वारे गुरुजी शिक्षण पद्धती बद्दल सुद्धा माहिती देण्यात आली.