कामगार कौशल्य विकास अभियानांतर्गत प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने आयोजन
कामगार कौशल्य विकास अभियानांतर्गत प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने आयोजन
पिंपरी, ता. १० - कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित कामगार कौशल्य विकास अभियान अंतर्गत लाभार्थींना विविध कौशल्य प्रशिक्षण, महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ रविवारी (ता. १४) प्रदान करण्यात आला.
या अभियानाचे उद्घाटन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी, लेदर इंडस्ट्रीज डेवलपमेंट कॉर्पोरेशनचे (लीडकॉम) माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित कामगारांना कौशल्यवृद्धी, स्वावलंबन आणि संघटित लढ्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कामगारांचे कौशल्य विकसित होऊन त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात, त्यांच्या कामाच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी आणि त्यांना अधिक चांगले वेतन मिळावे, या उद्देशाने विविध प्रकारची प्रशिक्षणे देण्यात आली. या प्रशिक्षणांत सहभागी झालेल्या कामगारांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र देण्यात आले. पात्र लाभार्थींना अर्थसाहाय्याचे वितरण करण्यात आले. कामगारांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देत त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.
सामाजिक न्याय आणि श्रमाचा सन्मान यासाठी कौशल्य विकास हा परिवर्तनाचा प्रभावी मार्ग असून, प्रत्येक कष्टकरी कामगाराला सन्मानाने जगण्याचा आणि प्रगतीची समान संधी मिळण्याचा हक्क आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांसमवेत कष्टकरी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रमुख काशिनाथ नखाते यांनी संयोजन केले.