ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीरला १२ लाखांची शिष्यवृत्ती
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीरला १२ लाखांची शिष्यवृत्ती
पुणे, ता. २५ - महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि त्याचे प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी नुकतीच मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी हर्षवर्धनला १२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती आणि काका पवार यांच्या पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलासाठी ५० लाख रुपयांचा निधी बक्षिस दिला आहे. पवार यांनी हर्षवर्धनचे अभिनंदन करुन त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी हर्षवर्धनने व काका पवार यांनी मनोगत व्यक्त केले. दोघांनी पवार यांचे आभार मानले. हर्षवर्धन म्हणाला, ''गुरु काका पवार यांच्या सल्ल्यानंतर मी पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे. आता ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मदत मोलाची व प्रोत्साहन देणारी आहे.''
काका पवार म्हणाले, ''शरद पवार हे खेळाडूंसाठी तारणहार व आधार आहेत. ते कुस्तीगीरांसाठी अनेकदा धावून आले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पहिलवान व खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणाच केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्यांचे व प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले आहे. '' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काका पवार व हर्षवर्धनने भेट घेतली. त्यावेळी हर्षवर्धनला नाशिक महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे, काका पवार यांनी सांगितले.