पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराचा कायापालट होणार, अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत २८ कोटींचा निधी मंजूर
पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराचा कायापालट होणार, अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत २८ कोटींचा निधी मंजूर
पुणे, ता. २० - अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिराचा कायापालट होणार आहे. मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी २८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये मंदिराचे मूळ रुप जपून नूतनीकरण करण्यात येणार आहे तसेच देवस्थाच्या परिसराचा कायापालट होणार आहे.
मंजूर निधीचे अधिकृत पत्र नुकतेच देवस्थानला प्रदान करण्यात आले आहे. लवकरच या विकासकामांचा प्रारंभ होणार आहे.
मंदिराचे नूतनीकरण करताना पारंपरिक बांधकामात दगड, लाकूड, चुना आणि पारंपरिक धातूंचा वापर केला जाणार आहे. येथे भव्य पायऱ्या आणि सुटसुटीत दर्शनबारी उभारण्यात येईल. मंदिरासमोर अडथळा ठरणारी दुकाने, जुन्या इमारती आणि पाणपोई हटवून तो भाग पूर्णपणे खुला केला जाणार आहे. त्या ठिकाणी भव्य पायऱ्या आणि सुटसुटीत दर्शनबारी उभारण्यात येईल. मुख्य मंदिराच्या वास्तुशैलीला साजेसे असे धुंडीविनायक मंदिराचे नूतनीकरण केले जाईल. येथील पत्र्याची छते काढून परिसर मोकळा केला जाईल. मंदिराला पूर्व, पश्चिम आणि उत्तर अशा तीनही बाजूंनी भव्य प्रवेश कमानी साकारल्या जातील. भाविकांसाठी सुविधाः अद्ययावत दर्शनरांग व्यवस्थापन, बसण्याची व्यवस्था, माहिती फलक, नवीन फरसबंदी आणि संपूर्ण परिसराचे विद्युतीकरण करण्यात येईल. सुरक्षाः परिसरात आधुनिक अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात येणार असून ऐतिहासिक कुंडाची स्वच्छता व दुरुस्ती केली जाईल. प्रशासकीय कामांसाठी आरसीसी पद्धतीने नवीन कार्यालय बांधले जाईल, हे कार्यालय बाहेरुन मंदिराप्रमाणेच दिसणार आहे.
याबाबत बोलताना मंदिराचे अध्यक्ष जितंद्र गद्रे यांनी सांगितले की, ''अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे बल्लाळेश्वर मंदिराचा कायापालट होणार आहे. मूळ ढाचा कायम ठेवून भाविकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.''Shri Ballaleshwar Temple Transformation