गर्भलिंग निदानाबाबतच्या समितीच्या सदस्यपदी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची शासनाकडून नियुक्ती
May 07 2026
41
गर्भलिंग निदानाबाबतच्या समितीच्या सदस्यपदी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची शासनाकडून नियुक्ती
पुणे, ता. ७ - गर्भलिंग निदानाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय तपासणी व संनियंत्रण समितीची पुनर्रचना झाली आह. या समितीवर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम, २००३ कायद्याच्या अंमलजावणीसाठी ही समिती कार्यरत आहे.
गर्भलिंग निदान कायद्याच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे, सोनोग्राफी व जेनेटिक काउन्सेलिंग केंद्रांची तपासणी करणे, त्या ठिकाणी अनियमितता आढळल्यास मशीन सील बंद करण्यासाठी सूचना देणे, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून नियंत्रण यंत्रणा मजबूत करणे या बाबींसाठी ही समिती काम करते. समितीचा कार्यकाळ ३ वर्षाचा असणार आहे. या समितीत आरोग्य मंत्री अध्यक्ष व राज्यमंत्री उपाध्यक्ष आणि सदस्य आमदार स्नेहा दुबे-पंडित, महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला असून, संबंधित यंत्रणांना तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.
या नियुक्तीबद्दल बोलताना आमदार स्नेहा दुबे-पंडित म्हणाल्या, "मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि समाजातील लिंग समतोल राखण्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. या समितीच्या माध्यमातून कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच जनजागृतीलाही प्राधान्य दिले जाईल."