संत तुकारामनगरमधील पाणीपुरवठा सुरळीत करावा, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानची मागणी
Feb 26 2026
39
संत तुकारामनगरमधील पाणीपुरवठा सुरळीत करावा, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानची मागणी
पिंपरी, ता. २६ - संत तुकारामनगर परिसरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांची गैरसोय होत आहे. आधी एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा व्हायचा पण अलिकडे सलग दोन-तीन दिवस पाणी येत नसल्याने नागरीक वैतागले आहे. आता उन्हाळ्याची सुरवात होत आहे. त्यामुळे संत तुकारामनगर परिसरातील पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी केली आहे. याबाबत, त्यांनी महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २०, संत तुकारामनगर परिसरात गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा अत्यंत अनियमित व विस्कळीत होत आहेत. आधी एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा होत असताना महिनाभरापासून सलग दोन ते तीन दिवस नळांना पाणी येत नाहीये. त्यामुळे नागरीक संतापले आहेत. त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
महापौरांनी याबाबतीत लक्ष घालावे, संबंधित प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. किमान पूर्ववत एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा नागरीक आंदोलन करतील, असे म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे.