बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने विजयी
पुणे, ता. ४ - सबंध राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विजयी झाल्या आहेत. मतमोजणीच्या २४ च्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मतांनी आघाडी घेत त्यांनी विजय मिळवला. हा विजय म्हणजे, सुनेत्रा वहिनींच्या रुपात अजितदादांचे छत्रच बारामतीकरांना मिळाले आहे.
विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानले. बारामती मतदारसंघात गेली अनेक वर्षांपासून अजितदादाच आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे अजितदादांनतर सुनेत्रावहिनीच निवडून याव्यात ही बारामतीकरांची इच्छा होती. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांना विनंती केली होती. कॉंग्रेसने निवडणूकीतून माघार घेतल्याने निवडणूक एकतर्फीच होण्याचे चित्र दिसत होते आणि तसेच झाले. सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवाराला हजारापेक्षा जास्त मते देखील पडली नाहीत. करूणा मुंडे यांना 125 मते मिळाली आहेत तर अभिजित बिचुकले यांना 121 मते मिळाली आहेत. विक्रमी मताधिक्य मिळवण्यासाठी किमान १ लाख २३ हजार २६५ मते आवश्यक असताना, सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत एकूण २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
विजयानंतर, "आजचा निकाल जाहीर होत असताना दादांच्या आठवणींनी आपण सर्वजण भावूक आहोत. त्यामुळे कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. संयम राखत दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करुया. विजयाचा जल्लोष साजरा करु नये.", असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. विजयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रावहिनींवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.