थेरगाव रुग्णालयाची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी
पिंपरी, ता. ३ - थेरगाव येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका रुग्णालयाला खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची आणि व्यवस्थापनाची पाहणी केली.
रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्या सोयी-सुविधा मिळतात, औषधोपचार वेळेत मिळतात का, याबाबत रुग्णांची विचारपूस करून माहिती घेतली. रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याही सामान्य नागरिकाला उपचारासाठी ताटकळत उभे राहावे लागू नये आणि प्रत्येकाला योग्य वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी रुग्णालयातील संबंधित डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांना आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी श्री. लक्ष्मण गोखले, 'ग' क्षेत्रिय अधिकारी श्री. मुकेश कोळप, थेरगाव हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर मोसलगी, डॉ. सोनेकर, 'ग' क्षेत्रिय कार्यालय स्थापत्य विभागाचे अधिकारी हेमंत देसाई, मनोज बोरसे आणि विद्युत विभाग कनिष्ठ अभियंता पवन दांडळे उपस्थित होते.