वैष्णो देवी दर्शनाला जाणे अधिक सोयीचे होणार, वंदे भारत एक्सप्रेसच्या कटरा मार्गात बदलाचा निर्णय
Apr 04 2026
50
वैष्णो देवी दर्शनाला जाणे अधिक सोयीचे होणार, वंदे भारत एक्सप्रेसच्या कटरा मार्गात बदलाचा निर्णय
पुणे, ता. ४ - वैष्णो देवीच्या दर्शनाला जाणे आता सुलभ होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस गाडीच्या कटरा मार्गात बदल करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे, अशी माहिती माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २६४०५/२६४०६ अमृतसर-कटरा वंदे भारत एक्सप्रेस आता जालंधर कॅन्ट मार्गाऐवजी गुरदासपूर मार्गे धावणार आहे. ही गाडी अमृतसर ते कटरा हा प्रवास अवघ्या ५ तासांत पूर्ण करेल आणि गाडी आता शनिवार वगळून आठवड्यातील सर्व दिवस धावणार आहे.
नवीन मार्गानुसार अमृतसर-कटरा वंदे भारत एक्सप्रेस गाडी बटाला, गुरदासपूर, पठाणकोट आणि जम्मू तवी या चार महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार, कटरा ते अमृतसर (गाडी क्रमांक २६४०६) ही गाडी श्री माता वैष्णो देवी देवस्थान-कटरा येथून सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी अमृतसर येथे पोहोचेल.
अमृतसर ते कटरा (गाडी क्रमांक २६४०५) ही गाडी अमृतसरहून सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी कटरा येथे पोहोचेल. गुरदासपूर मार्गे धावणाऱ्या या वंदे भारत गाडीत एकूण ८ डबे असणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या पत्रानुसार हे बदल आगाऊ आरक्षण कालावधीनुसार टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.