विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान
पुणे, ता. १८ - विधान परिषदेच्या ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी गुरुवारी (ता. १८) राज्यात मतदान होत आहे. राज्यातील १७ जागांसाठी निवडणूकीची घोषणा करण्यात आली होती. त्यातील सहा जागा बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ११ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे.
पसंतीक्रमानुसार होणाऱ्या या निवडणुकीमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये, यासाठी महायुतीतील पक्षांनी खबरदारी घेतली असून महायुतीचा अधिकृत उमेदवार सोडल्यास इतर कुठल्याही उमेदवाराला मतदान करू नये, अशा आशयाचे व्हिप बजावण्यात आले आहेत. तसेच, या व्हिपविरोधात जाऊन कुणी मतदान केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
जळगाव, सोलापूर, सांगली-सातारा, नागपूर, नांदेड, परभणी-हिंगोली, भंडारा-गोदिंया, अमरावती, नाशिक, धाराशिव-बीड-लातूर, छत्रपती संभाजीनगर-जालना, अमरावती, येथे आज विधान परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडेल. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, पुणे, अहिल्यानगर, वर्धा या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.