राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसांत उष्णतेच्या लाट, स्कायमेटचा अंदाज
पुणे, ता. १० - गेल्या काही दिवसांत राज्यभरात अवकाळी पाऊस पडल्यानंतर आता पुन्हा उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. ११ व १२ एप्रिलला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.
स्कायमेटने म्हटले आहे की, ११ एप्रिलच्या दरम्यान वेस्टर्न डिस्टरबन्स म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे. उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये आता हवामान कोरडे राहील. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल.
त्यामुळे, नागरीकांनी दुपारचे घराबाहेर पडणे टाळावे, असे स्कायमेटने सांगितले आहे.