आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी विविध विभागांना तयारी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी विविध विभागांना तयारी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
पुणे, ता. २७ - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जवळ आला आहे. पालखी मार्गातील अतिक्रमणे, अनधिकृत जाहिरात फलक, स्वागत कमानी तातडीने हटविण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिले आहेत.
पथ विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून पालखी मार्ग सुस्थितीत ठेवण्याचे नियोजन करावे असे सांगण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने पोर्टेबल शौचालये, जेटिंग मशीन, स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्युत विभागाने प्रकाशयोजना, सीसीटीव्ही व जनरेटरची व्यवस्था करावी, तर आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके, औषधसाठा व रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात, असेही सांगण्यात आले.
वॉर्ड कार्यालयांना पालखी मार्गावरील अतिक्रमणे, अनधिकृत जाहिराती व पोस्टर्स हटविणे, झाडांच्या फांद्या छाटणे आणि मार्ग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली.
भवन विभागाने आवश्यक ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारावेत, पाणीपुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तर शिक्षण विभागाने शाळांमध्ये वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पशुवैद्यकीय विभाग, आकाशचिन्ह विभाग आणि इतर संबंधित विभागांनीही समन्वयाने काम करून पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
पालखी मार्गावरील सर्व झाडांच्या फांद्या छाटून मार्ग अडथळामुक्त करावेत. वारकऱ्यांसाठी पायांची मालिश करण्यासाठी यंत्र उपलब्ध करून द्यावीत. आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागांनी समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
पालखी मार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त नायर यांनी दिले.