चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

 चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

 मुदतीनंतर प्रशासनाकडून अतिक्रमणे हटवून खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार

पिंपरी, ता. ६ ऑगस्ट २०२६ - चाकण एमआयडीसी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसी यांच्या अखत्यारीतील सर्व रस्ते येत्या २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्यात यावेत. २५ ऑगस्ट नंतर आपण प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगून निर्धारित मुदतीनंतर अतिक्रमण काढली नाहीत तर कार्यवाही होणार तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

चाकण परिसरातील रस्त्यातील खड्डे, वाहतूक व्यवस्था, पावसाळ्यातील उपाययोजना तसेच नदी, नाल्यातील अतिक्रमणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता निलेश मोडवे, एमआयडीसीचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार संजयकुमार मांगीलवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे शिवकुमार गोपाल, चाकण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गुलाब इनामदार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)चे अधीक्षक अभियंता प्रवीण सुमंत यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, ''चाकण परिसरातील नदी, नाले तसेच सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे संबंधितांनी एका महिन्याच्या आत स्वखर्चाने काढून घ्यावीत. मुदत संपल्यानंतरही अतिक्रमणे कायम राहिल्यास प्रशासनामार्फत ती हटविण्याची कारवाई करण्यात येईल. अतिक्रमण हटविण्यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल. तसेच संबंधितांविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार कारवाईही करण्यात येईल.''

बैठकीत चाकण परिसरातील धोकादायक ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. 'वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक गतिरोधक काढून राष्ट्रीय रस्ते काँगेसच्या मानांकानुसार गतिरोधक उभारावेत, तसेच आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, रस्ता चिन्हे, परावर्तक पट्ट्या आणि इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात तसेच रस्त्यावर पार्किंग करणाऱ्यावर नियमानुसार दंड बसवून रस्त्यावर कोणीही पार्किंग करणार नाही.', अशा सूचनाही दिल्या.

रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रस्त्यांवरील खड्डे आणि अतिक्रमणांच्या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी स्पष्ट केले.

बैठकीत संबंधित विभागांच्या कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

बैठकीत चाकण परिसरातील रस्त्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः तळेगाव चौक, राणूबाईमळा, खराबवाडी, वाघजाई नगर–खराबवाडी रोड, म्हाळुंगे इंगळे येथील सर्व चौक, खालुंब्रे येथील सर्व चौक, शिंदे वासुली येथील सर्व चौक, आंबेठाण वाय कॉर्नर, कोरेगाव फाटा तसेच बिरदवडी फाटा, दवने मळा ते द्वारका सिटी रोड, कॉर्निंग कंपनी ते राष्ट्रीय महामार्ग पुणे -नाशिक या ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला असल्याची नोंद घेण्यात आली. या सर्व ठिकाणी तातडीने खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांच्या कडांची सुधारणा करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories