तळेगाव उद्यानात व घोरावडेश्वर डोंगरावर वन विभाग १२ हजार वृक्षांची लागवड करणार
पिंपरी, ता. २१ - घोरावडेश्वर डोंगर व तळेगाव उद्यान परिसरात महाराष्ट्र शासनाचा वन विभाग सामाजिक संस्थांच्या मदतीने १२ हजार वृक्षांची लागवड करणार आहे. येत्या पावसाळ्यात सामाजिक संस्था, संघटनांची मदत घेऊन वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केले जाणार आहे.
घोरवडेश्वर डोंगरावर भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. दर शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी असते. अलीकडे डोंगराच्या उभ्या चढणीवर तसेच मंदिराच्या बाजूला असलेल्या वृक्षांची संख्या कमी झाली आहे. ही वृक्षसंख्या वाढवण्याचा संकल्प वन विभागाने केला आहे. पर्यटकांना शुद्ध हवेतील पर्यटनाचा आनंद घेता यावा, म्हणूनही वन विभाग वृक्ष लागवड करणार आहे.
याशिवाय, वणव्यांमुळे वनसंपत्तीचे नुकसान टाळण्यासाठीही वनविभाग सतर्क राहणार आहे. ''वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी वनविभाग दक्ष झाला आहे. आरोपी सापडल्यास तात्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे. नागरिकांनीही जंगलसंपत्ती वाचवण्यासाठी सहकार्य करावे. वणवा पेटलेला दिसताच वनविभागाशी संपर्क साधावा. '', असे शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले व वडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी सांगितले आहे.