'मिसब्रँडेड' खाद्य उत्पादनांवर १० लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होणार, अन्न व औषध प्रशासनाची माहिती
Mar 23 2026
41
'मिसब्रँडेड' खाद्य उत्पादनांवर १० लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होणार, अन्न व औषध प्रशासनाची माहिती
पुणे, ता. २३ - खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या 'मिसब्रँडेड' उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. ग्राहकांना चुकीची माहिती देणाऱ्या खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांवर १० लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाने सांगितले आहे की, ज्या खाद्यपदार्थावर चुकीची, दिशाभूल करणारी माहिती दिली जाते, त्याला 'मिसर्बेडेड फूड' म्हणतात. यात घटकांची चुकीची माहिती, खोटे आरोग्यदावे किंवा भ्रामक लेबलिंगचा समावेश होतो. अनेक खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर मागील बाजूस दिलेली पोषणमूल्ये, घटकांची यादी दिलेली असते. मात्र, प्रत्यक्षात त्या खाद्यपदार्थात त्या घटकांचे प्रमाण अत्यल्प असते. अनेकदा फळांचा रस असल्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांत फळांचा अंश अत्यल्प प्रमाणात आढळतो. आकर्षक पॅकेजिंग, रंगीत चित्रे आणि भ्रामक शब्दांचा वापर करुन ग्राहकांना चुकीची माहिती दिली जाते. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होते आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी जागरुक राहून खाद्यपदार्थ खरेदी करणे आवश्यक आहे.
अन्न व औषध प्रशासनाने अशा फसव्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, दोषी आढळलेल्या कंपन्यांना १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. ग्राहकांना संशयास्पद किंवा भ्रामक उत्पादन आढळल्यास अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार करता येते, तसेच ऑनलाइन पोर्टल किंवा हेल्पलाइनद्वारेही तक्रार नोंदवता येते, असे प्रशासनाने सांगितले.