मोशीमधील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामांसाठीच्या निविदा प्रक्रियेवरुन सर्वसाधारण सभेत गदारोळ
राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे आणि शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली सखोल चौकशीची मागणी
पिंपरी, ता. १३ - मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे आणि शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभा आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात पार पडली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या निविदा प्रक्रियेवरुन सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.
नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, ''इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पासाठी काढलेल्या निविदांमध्ये केवळ दोनच ठेकेदार सहभागी होणे हे संशयास्पद आहे. “शहरात केवळ दोनच ठेकेदार आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अनेक विकासकामांच्या निविदा साधारणतः ३० ते ४० टक्के कमी दराने येत असताना काही ठराविक कामांमध्ये दिलेल्याच दरांवर निविदा स्वीकारल्या जात असल्याने शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच काही निविदांमध्ये स्थापत्य आणि विद्युत विभागाशी संबंधित कामे एकत्रितपणे समाविष्ट केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामांच्या निविदा एकत्र काढल्यास अनेक ठेकेदारांना सहभागी होता येत नाही आणि स्पर्धा मर्यादित राहते.'', असे मत त्यांनी व्यक्त केले.
नगरसेविका सुलभा उबाळे यांनीही या विषयावरून प्रशासनावर टीका केली. त्या म्हणाल्या, ''छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हा शहराच्या अस्मितेशी निगडित विषय आहे. त्यामुळे या प्रकल्पातील सर्व कामे पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने होणे अत्यावश्यक आहे.''
या पार्श्वभूमीवर संबंधित निविदा प्रक्रिया नव्याने राबविण्यात यावी, सर्व पात्र ठेकेदारांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी द्यावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संदीप वाघेरे आणि सुलभा उबाळे यांनी केली आहे. या प्रकरणामुळे संभाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवरून महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.