'एसटी'च्या 'राजमाता जिजाऊ' बससेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
'एसटी'च्या 'राजमाता जिजाऊ' बससेवेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे, ता. 24 : राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत 'राजमाता जिजाऊ' ही नवीन बससेवा समाविष्ट झाली आहे. या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २४) विधिमंडळाच्या प्रांगणात झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, '' 'राजमाता जिजाऊ' बससेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे, लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल तीन हजार 'राजमाता जिजाऊ' या नावाने नव्या स्मार्ट बस दाखल होणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी या गाड्यांना राजमाता जिजाऊ हे नाव दिले आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी 'शिवनेरी', 'शिवशाही', 'शिवाई', 'यशवंती' आणि 'हिरकणी' अशा ऐतिहासिक नावांनी बससेवेला वेगळी ओळख दिली आहे. त्या गौरवशाली परंपरेत आता 'राजमाता जिजाऊ' या नावाची भर पडल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान अधिक समृद्ध झाला आहे. ''
'' 'राजमाता जिजाऊ' या बस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गावर शटल सेवेसाठी चालविण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. पहिल्या ५० बस नागपूर येथे दाखल होणार आहेत. तेथून या नव्या सेवेची सुरुवात होणार आहे.
'राजमाता जिजाऊ' या बसची एकूण ५६ आसन क्षमता आहे. ही क्षमता सध्याच्या बसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. या बसमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे.'', असे सरनाईक यांनी सांगितले.