भाडेदरावरुन झालेल्या वादात रिक्षाचालकाची प्रवाशांना मारहाण, तिघे जखमी
पिंपरी, ता. २४ - ओला अॅपद्वारे बुक केलेल्या रिक्षाचे जादा भाडे मागितल्याच्या वादातून रिक्षाचालकाने प्रवाशांवर हल्ला केल्याची घटना वल्लभनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ मार्चला रोजी सकाळी ११.४० सुमारास साईबाबा मंदिराच्या पाठीमागे, वल्लभनगर-पिंपरी येथे घडली. फिर्यादी सुभाष छबुलाल अमृतकर (वय ६९) हे आपल्या मुलगा मयुर व सून निकिता यांच्यासह ओला अॅपद्वारे रिक्षा (क्र. MH 14 LS 0457) बुक करुन घरी आले होते.
दरम्यान, रिक्षाचालकाने ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त रक्कम मागितल्याने अमृतकर यांनी त्याला जाब विचारला. यावरुन संतापलेल्या चालकाने रिक्षामधील लाकडी फळी काढून मयुर यांच्या डोक्यात मारहाण केली. वडील सुभाष अमृतकर हे मध्ये पडल्यावर त्यांच्या छातीवरही फळीने मारले. आरोपीने त्यांच्या नाकावर व छातीवर बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना ढकलून दिले, त्यामुळे ते जमिनीवर पडले.
या झटापटीत निकिता यांनाही आरोपीने ढकलून दिले. त्यानंतर रिक्षाचालक घटनास्थळावरुन फरार झाला.
या प्रकरणी सोमवारी (ता. २३) रात्री ९.४५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२ तसेच भादवि कलम ३२४, ३२३, ५०४ अन्वये कारवाई करण्यात येत आहे