पोलिस-नागरिक संवादासाठी सुरु होतोय खास उपक्रम ......'पोलीस आयुक्तांची भेट'
पिंपरी, ता. ३ - नागरिकांशी अधिक प्रभावी, पारदर्शक व सकारात्मक संवाद प्रस्थापित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत 'पोलीस आयुक्तांची भेट' हा विशेष उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नागरिक व शहरातील अभ्यागतांना पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट भेट घेऊन आपल्या सूचना, तक्रारी व अपेक्षा मांडण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे.
सदर, उपक्रम दर सोमवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात (प्रेमलोक पार्क-चिंचवड) होणार आहे. या संवादासाठी सर्व पोलीस उपायुक्त, सर्व अपर पोलीस आयुक्त,पोलीस सह आयुक्त, पोलीस आयुक्त उपस्थित राहणार आहेत.
यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारे पुर्व परवानगी घेण्याची आवश्यकता नसून नागरिक उपक्रमाच्या दिवशी विहित वेळेत बिनदिक्कत पोलीस आयुक्तांना भेटू शकतील. नागरिक-केंद्रीत पोलीसिंगच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत असून, कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करणे, तक्रार निवारण प्रक्रियेला गती देणे व प्रशासनाबद्दल विश्वास अधिक दृढ करणे हा यामागील उद्देश आहे.
सदर उपक्रमात नागरिकांच्या समस्या व सूचनांचे जलद व प्रभावीरितीने निवारण केले जाईल. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिक, औद्योगिक प्रतिनिधी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच शहरातील अभ्यागतांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.