पुणे जिल्ह्यात पुढील तीन-चार दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या-मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
पुणे जिल्ह्यात पुढील तीन-चार दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या-मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
पुणे, ता. २२ - रविवारी (ता. २१) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पावसाला सुरवात झाली. पुण्यात पावसाच्या मोठ्या सरी बरसल्या तर पिंपरी-चिंचवडमध्ये काही भागातच एखादी सर बरसली. पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवसांसाठी 'यलो' अलर्ट देण्यात आला.
रविवारी शहरात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि परिसरात सोमवारी (ता. २२) कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मंगळवारपासून (ता. २३) कमाल तापमानात किंचित घट होईल. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.