अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे जिल्ह्यात अन्नसेवा आस्थापनांची सोमवारपासून तपासणी मोहिम

अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे जिल्ह्यात अन्नसेवा आस्थापनांची सोमवारपासून तपासणी मोहिम

अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे जिल्ह्यात अन्नसेवा आस्थापनांची सोमवारपासून तपासणी मोहिम 

हॉटेल्स, उपाहारगृहे, ढाबे, खानावळी, मिठाईची दुकाने, बेकरी, ज्यूस सेंटर, रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या सर्वांची होणार तपासणी 

पिंपरी, ता. २९ -  अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व अन्नसेवा आस्थापनांची तपासणी सोमवारपासून (ता. २९)  होणार आहे. हॉटेल्स, उपाहारगृहे, ढाबे, खानावळी, मिठाईची दुकाने, बेकरी, ज्यूस सेंटर, रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या सर्वांची यामध्ये तपासणी केली जाईल.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर, विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

या तपासणी मोहिमेत अन्न सुरक्षा कायद्याचे पालन, परवाना, स्वच्छता, अन्नातील भेसळ, खाद्यतेलाचा पुनर्वापर, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, अन्न साठविण्याची पद्धत, तापमान नियंत्रण, तसेच ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते की नाही, या बाबींची बारकाईने तपासणी केली जाणार आहे. ग्राहकांना बाटलीबंद पाणी खरेदी करण्यास सक्ती करणाऱ्या आस्थापनांवरही कारवाई केली जाणार आहे.

तपासणी मोहिमेपूर्वी गुरुवारी पुण्यात हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, खानावळी, मिठाई दुकाने आणि ज्यूस सेंटर चालकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत ४१ प्रतिनिधींना परवाना, स्वच्छता, सुरक्षित अन्नाची विक्री, ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याबाबत, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) दिगंबर भोगावडे म्हणाले, ''नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणे कायदेशीर अधिकार आहे. अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोणत्याही आस्थापनावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सोमवारपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात ही मोहीम तीव्रतेने राबविण्यात येणार आहे.''



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories