पुण्यातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेत वर्षाअखेरीस मोठा व चांगला बदल होईल - आयुक्त नवल किशोर राम
पिंपरी, ता. १८ - "या वर्षाअखेरीस पुणे शहरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेत मोठा व चांगला बदल घडलेला दिसेल. शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम, सुरक्षित व वेगवान करण्यासाठी महापालिकेकडून अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. कमी खर्च व वेळेचे नियोजन करुन अल्पकालीन योजना प्रत्यक्षात उतरविण्यावर प्रशासनाचा भर असेल. त्यासाठी पोलिस, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व विभागांना बरोबर घेऊन लोकसहभागातून काम केले जाणार आहे.'' असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी (ता.१७) सांगितले.
महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकारी, अभियंत्यांसाठी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित व वेगवान करण्यासाठी महापालिकेतर्फे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम, सभागृहनेते गणेश बिडकर यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, ओमप्रकाश दिवटे, पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक अमित परांजपे, साकार रोबोटीक्सचे सहसंस्थापक डॉ. मनोज पोचट उपस्थित होते.
आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, "कुशल मनुष्यबळ, कायदा-सुव्यवस्था, पर्यावरण चांगले असल्यामुळे ग्लोबल कम्युनिटी सेंटर, आयटी व अन्य क्षेत्रांची पुण्यात वाढ झाली आहे. मात्र, पुणे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. शहरात पुणेकरांची वाहतूक केवळ ५० टक्के इतकी आहे, उर्वरित वाहतूक ग्रामीण भागातून पुणे शहर मार्गे पुढे जाणारी वाहतूक असल्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवते. सध्या मेट्रो, रिंगरोड, मिसिंग लिंकची कामे सध्या सुरु आहेत, पाच वर्षात ही कामे पूर्ण झाल्यानंतर २०३० नंतर पुण्यात वाहतुक कोंडीचा प्रश्न उद्भवणार नाही. रस्त्यांचे रुंदीकरण, महावितरणचे पथदिवे, फिडर बॉक्स, अनधिकृत होर्डिंग, अतिक्रमणे हटवून चांगले रस्ते झाले पाहिजेत व हा बदल सन २०२६ अखेरपर्यंत दिसेल.''
महापौर नागपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. विकासकामे करताना नागरीकांच्या सूचना विचारात घेतल्या पाहिजेत असे त्या म्हणाल्या. अनिरुद्ध पावसकर यांनी दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे वाहतुकीची सद्यःस्थिती मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर गोजारे यांनी केले.