राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियानात नागरीकांनी तपासणी व उपचारांचा लाभ घ्यावा, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन
पुणे, ता. २६ - महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागमार्फत राज्यात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरुपात राबविले जाताहेत आणि सध्या चालू असलेल्या आर्थिक वर्षातील उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी राज्यभरात आरोग्यविषयक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या मोहिमांची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दिली आहे. नागरिकांनी तपासणी व उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागमार्फत राबवण्यात आलेले उपक्रम आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार राबवले गेले. यामध्ये 'अरुणोदय' सिकलसेल अभियानांतर्गत १५ जानेवारीपासून २१ जिल्ह्यांत शून्य ते ४० वयोगटातील ४० लाख पाच हजार ७५० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, एक हजार ६३ रुग्ण व १७ हजार ६७९ वाहक आढळले आहेत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ३३४ हृदय शस्त्रक्रिया व २,२४० इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.
तीव्र रक्तक्षय असलेल्या चार हजार ३७२ गरोदर मातांची तपासणी करून तीन हजार ९६३ मातांना आयर्न सुक्रोज किंवा फेरिक कार्बोक्सी माल्टोज उपचार देण्यात आले.
हत्तीरोग निर्मूलन मोहिमेत ९९३ पात्र रुग्णांपैकी ६०८ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या; गडचिरोलीत २१०, तर चंद्रपूरमध्ये १३० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत राज्यात ३६ हजार ५०७ निक्षय मित्र नोंदणीकृत असून, एक लाख ५७ हजार १७३ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी २२ हजार २०१ रुग्णांना अन्नधान्य किट वितरित करण्यात आले.
कुष्ठरोग प्रतिबंध मोहिमेत १६ हजार ७६१ रुग्ण नोंदले गेले असून, चार लाख ४७ हजार २९६ सहवासितांपैकी तीन लाख २५ हजार ४६० जणांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले.
असंसर्गजन्य रोग तपासणीत नऊ लाख ४१ हजार ६७४ नागरिकांची उच्च रक्तदाब व आठ लाख ५० हजार ८५७नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली असून, अनुक्रमे ६२ हजार ६९३ व ३६ हजार ३२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.