पथविक्रेत्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करु
जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघ व लोक जनशक्ती पक्षाचा इशारा
पुणे, ता. २५ - पथविक्रेत्यांना नियमानुसार जागा देणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात अतिक्रमण कारवाई करुन त्यांना व्यवसायापासून वंचित केले जात आहे. असा आरोप लोक जनशक्ती पक्षाने (एससी-एसटी सेल) आणि जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाने केला आहे. पथविक्रेत्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष संजय आल्हाट, कायदे सल्लागार मिलिंद गायकवाड आणि सरचिटणीस के. सी. पवार यांनी आपली भूमिका मांडली.
या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या सुमारे २६ महिन्यांपासून सातत्याने निवेदने, पत्रव्यवहार आणि आंदोलने करुनही पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन अधिनियम २०१४ आणि महाराष्ट्र नियम २०१६ नुसार सर्वेक्षण करून पथविक्रेत्यांना नियमानुसार जागा देणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात अतिक्रमण कारवाई करुन त्यांना व्यवसायापासून वंचित केले जात आहे.
पथविक्रेत्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.