तारेचे कुंपण तोडून कंपनीत घुसून १ लाख १६ हजारांच्या सामानाची चोरी, युवकाला अटक
पिंपरी, ता. २३ - तारेचे कुंपण तोडून एका कंपनीच्या आवारात शिरुन एका २४ वर्षीय युवकाने त्या कंपनीतून एकूण १ लाख १६ हजार रुपये किंमतीचे विविध सामान चोरुन नेले. ही घटना २१ व २२ मार्च दरम्यान भोसरीमधील क्वाड्रोजन इंडिया प्रा.लि कंपनीमध्ये घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत, संतोष नंदन माटे (वय ४४ वर्षे, धंदा - नोकरी, रा. दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जावेद निजाम शेख (वय २४) याने कंपनीच्या भिंतीलगत असलेले तारेचे कंपाउंड कापून आत प्रवेश केला. त्यानंतर कंपनीमधील पाईप, रॉड तसेच ब्रिकनेसच्या दोन प्लेट्स असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा माल चोरुन नेला.
या प्रकरणी आरोपीविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.