चाकणजवळ दोन दुचाकींची धडक, एक जखमी, एकाचा खांदा फ्रॅक्चर
पिंपरी, ता. २३ - खेड तालुक्यात चाकणकडून भाम वाकीकडे जाणाऱ्या रस्त्यानर भरधाव व निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाले असून त्यापैकी एकाचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे. हा अपघात शनिवारी (ता. २१) रात्री सुमारे ९.४० वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत, शिवम अरविंद साबळे (वय १९, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हनुमंत पिराजी मोकले (रा. खेड) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शिवम साबळे व त्यांचा मित्र निशांत काळे हे अॅक्टिवा (MH 14 KG 0273) या दुचाकीवरुन प्रवास करत होते. त्यावेळी निशांत काळे हे वाहन चालवत होते. दरम्यान, मागून येणाऱ्या पॅशन-प्रो (MH 14 BP 1462) या दुचाकीवरील चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत साबळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दोघेही रस्त्यावर पडले. शिवम साबळे यांच्या कपाळाला व नाकाला किरकोळ दुखापत झाली, तर निशांत काळे यांच्या उजव्या खांद्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. तसेच अॅक्टिवा दुचाकीचे पुढील नुकसान झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.