भोसरीत बेकायदेशीर गॅस रिफिलिंग प्रकरण उघड, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २६ - भोसरी परिसरात बेकायदेशीररित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस भरुन त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला नोटीस बजावली आहे. एकूण २८,१००/- किंमतीचा अवैधगॅस साठा व साहीत्य पोलिसांनी जप्त केले आहे.
मंगळवारी (ता. २४) रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास भगत वस्ती, हनुमान मंदिराजवळील “राघव होम अॅप्लायन्स” येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश माधवराव मोरे (वय ३३, रा. भोसरी, मूळ रा. लातूर) हा विनापरवाना मोठ्या गॅस सिलेंडरमधून ४ किलोच्या लहान लोखंडी सिलेंडरमध्ये गॅस भरत होता. ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक पद्धतीने, कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता केली जात होती. ज्वालाग्राही पदार्थ असल्याची पूर्ण जाणीव असूनही आरोपीने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती केली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे २८,१०० रुपयांचा अवैध गॅस साठा व गॅस ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. हा गॅस चढ्या दराने विक्री करण्याचा आरोपीचा उद्देश असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कलम ३, ७ व पुरवठा व वितरण नियमन आदेश २००० मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस बीएनएसएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.