पिंपळे गुरव येथे अवैध गॅस रिफिलिंग करताना आरोपी अटकेत
पिंपरी, ता. २६ - पिंपळे गुरव परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करताना एका व्यक्तीस सांगवी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (ता. २५) सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास भाऊनगर-विष्मकर्मा मंदिराजवळ येथे करण्यात आली.
या प्रकरणी गोपाल राम अर्जुन राम विष्णोई (वय ३८) यास अटक करण्यात आली आहे. तो ओमप्रकाश राजपुरोहित यांच्या भाड्याच्या खोलीत राहात होता. आरोपी कोणतीही सुरक्षितता न पाळता लोखंडी रिफिल पाइपच्या सहाय्याने घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरत होता. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता.
पोलिस शिपाई आकाश दत्तात्रय खंडागळे (सांगवी पोलीस ठाणे) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून सुमारे ४७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी बीएनएस कलम ३०३(२), २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ व पुरवठा व वितरण नियमन आदेश - २००० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.