तळेगाव दाभाडे येथे ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने ११.२० लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. २३ - स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रशिक्षण देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची तब्बल ११ लाख २० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय चंद्रकांत शहाणे (वय ५८, रा. शहा कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १५ ऑक्टोबर २०२५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान त्यांच्या राहत्या घरी घडली. गुन्हा २२ मार्च २०२६ रोजी पहाटे नोंदविण्यात आला.
फिर्यादी शहाणे हे मोबाईलवरून स्टॉक मार्केटचे शिक्षण घेण्यासाठी गुगलवर शोध घेत असताना त्यांना “इक्विटी पल्स” नावाची वेबसाईट आढळली. त्यानंतर आरोपी कौस्तुभ टांकसाळे याने त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. पुढे शुभंकर शर्मा याने स्टॉक मार्केटचे प्रशिक्षण देण्याचे सांगून “EPQC PRIME” नावाचे ट्रेडिंग अॅप डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले.
सदर अॅप हे सेबीकडून नोंदणीकृत असल्याचा विश्वास आरोपींनी निर्माण केला. तसेच ब्रेकर धीरज अग्रवाल याच्यासोबत इन्व्हेस्टमेंट एग्रीमेंट करून दिल्याचे भासवले. त्यानंतर आरोपींनी शहाणे यांना विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी एकूण ११,२०,००० रुपये ऑनलाईन स्वरूपात संबंधित अॅपमध्ये गुंतवले. मात्र, नंतर पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याची जाणीव झाली.
या प्रकरणी कौस्तुभ टांकसाळे, शुभंकर शर्मा आणि ब्रेकर धीरज अग्रवाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींचे पत्ते अद्याप निष्पन्न झालेले नाहीत आणि त्यांना अटक झालेली नाही.