news
clock

'एलपीजी'ला पर्यायी इंधन पुण्यात विकसित, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांची कामगिरी

पुणे, ता. १४ - स्वयंपाकासाठी वापरावयाच्या सध्याच्या लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसला (एलपीजी) पर्यायी इंधन पुण्यातील  राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (सीएसआयआर-एनसीएल) शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. याबाबतची माहिती 'एनसीएल'चे संचालक आशिष लेले यांनी शुक्रवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. टी. राजा, टेक्सॉल इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक विजय कुमार व आर्टिअम इनोव्हेशनचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दाते उपस्थित होते. लेले यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक इंधन वायू तयार करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. विघटन होणाऱ्या कचऱ्यापासून हा 'डायमेथाइल इथर' (डीएमई) हा वायू तयार केला आहे. औद्योगिक मदतीने सध्या दररोज २५० किलो वायूचे उत्पादनही करण्यात येत आहे. 'डीएमई' हा वायू सध्याच्या 'एलपीजी'मध्ये ८ ते २० टक्क्यांपर्यंत मिसळता येऊ शकतो. भारत सध्या आपल्या एकूण जीवाश्म इंधन ऊर्जेपैकी ८० टक्क्यांहून अधिक ऊर्जा आयातीवर अवलंबून आहे. देशातील केवळ ८ टक्के 'एलपीजी'ची जागा जरी 'डीएमई'ने घेतली तरी दरवर्षी सुमारे ९ हजार ५०० कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होऊ शकते.  

लेले म्हणाले, "एनसीएल'मधील शास्त्रज्ञांनी मेथनॉलपासून 'डीएमई' तयार करण्यासाठी स्वदेशी (रासायनिक अभिक्रियेत तयार केलेला पदार्थ-कॅटॅलिस्ट) आधारित प्रक्रिया विकसित केली आहे. हा वायू स्वयंपाक घरातील ओला कचरा, विघटित होणारा सुका कचरा, उसाचे पाचट, बांबू आदी घटकांपासून तयार होत असल्याने पर्यावरणपूरक आहे. या वायूच्या गुणवत्तेच्या चाचण्या व तपासण्या झाल्या आहेत. त्यामधून वायूची उष्णता क्षमता व सुरक्षितता सिद्ध झाली आहे. सध्या पिरंगुट येथे दरदिवशी २५० किलो वायूचे उत्पादनही होत आहे. या वायूचे उत्पादन करणारे राजेश दाते यांनी वर्षभरात पुण्यात दरदिवशी अडीच टन हा वायू निर्माण करण्याचा प्रकल्प सुरू असल्याचे सांगितले आहे."


सध्या चीनमध्ये होतोय वापर

''डीएमई हा १०० टक्के 'एलपीजी'ला पर्याय ठरेल. पण, त्यासाठी शेगडीमध्ये काही बदल करावे लागतील. सध्या कोणताही बदल न करता ८ टक्के 'डीएमई' 'एलपीजी' सिलिंडरमध्ये मिसळून वापरता येऊ शकतो. पुढील सहा ते नऊ महिन्यांत दररोज २.५ टन क्षमतेचा प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याची तयारी सुरु आहे.  त्यानंतर प्रतिदिन ५०० ते हजार टन क्षमतेचे व्यावसायिक प्रकल्प उभारता येऊ शकतात.''

- आशिष लेले, संचालक, एनसीएल


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories