धावडेवस्ती-भोसरी येथे 'वेस्ट टू आर्ट' उपक्रमाद्वारे परिसराचे देखणे सुशोभिकरण
Mar 20 2026
31
धावडेवस्ती-भोसरी येथे 'वेस्ट टू आर्ट' उपक्रमाद्वारे परिसराचे देखणे सुशोभिकरण
महापौर रवी लांडगे यांनी केली पाहणी, वसुंधरा संवर्धनाची नागरीकांनी घेतली सामूहिक शपथ
पिंपरी, ता. २० - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत धावडेवस्ती-भोसरी (प्रभाग क्रमांक ६) येथे वेस्ट टू आर्ट' हा अभिनव उपक्रम राबवला आहे. 'स्वच्छ सर्वेक्षण' व 'माझी वसुंधरा' अभियानाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या या उपक्रमाची पाहणी महापौर रवी लांडगे, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी केली. महापौरांनी ‘वेस्ट टू आर्ट’ उपक्रम शहरभर राबविण्याचा मानस व्यक्त केला. स्वच्छ व सुंदर पिंपरी-चिंचवडसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
सदर उपक्रमात टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक सजावटीच्या वस्तू तयार करुन परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. भोसरी येथील कोंडीबा लांडगे मार्ग, धावडे वस्ती परिसरात स्वच्छता मोहिम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास महापौरांसोबत नगरसदस्या राजश्री लांडगे, माजी नगरसदस्य राजेंद्र लांडगे, मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, वैभव घोळवे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल , महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर रवी लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन नागरिकांना कचरा न टाकण्याचे आणि शहर स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. परिसरातील आर.आर.आर. सेंटरची पाहणी केली.
कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सफाई सेवकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित नागरिकांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वसुंधरा संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.