news
clock
अज्ञान आणि बेसावधपणातून होणारे मतांतर म्हणजे राष्ट्रांतर  -  डॉ. गौतम खट्टर

अज्ञान आणि बेसावधपणातून होणारे मतांतर म्हणजे राष्ट्रांतर - डॉ. गौतम खट्टर

अज्ञान आणि बेसावधपणातून होणारे मतांतर म्हणजे राष्ट्रांतर  -  डॉ. गौतम खट्टर 

निगडी-प्राधिकरणात 'स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार - २०२६' सोहळा

पिंपरी, ता. २७ - ''राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा समन्वय साधणारे राष्ट्र हीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची संकल्पना आहे. समाजात अज्ञानातून आणि बेसावधपणातून होणारे मतांतर हे राष्ट्रांतर असते, आपण देव धर्माच्या नावे देत असलेल्या दानाचाही नेमका काय उपयोग केला जातो याबाबत नक्की माहीत असली पाहिजे.'' असे मत प्रसिद्ध लेखक डॉ. गौतम खट्टर यांनी मांडले. 

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने आयोजित 'स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२६' सोहळा ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात नुकताच झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंडळाच्या वतीने गेल्या सतरा वर्षांपासून राष्ट्रनिष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा तेलंगणमधील नलगोंडा येथील रामावत नर्यानाईक यांना राष्ट्रीय पुरस्कार, तर अकोला येथील गजानन सोलकर यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने मिळालेला हा सन्मान म्हणजे पुनर्जन्मच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

डॉ. खट्टर म्हणाले, ''राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचा समन्वय साधणारे राष्ट्र हीच सावरकर यांची संकल्पना आहे.'' धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या परखड विचाराचीही त्यांनी आठवण करुन दिली. रामावत नर्यानाईक यांनी नलगोंडा जिल्ह्यात सात हजारांपेक्षा अधिक धर्मांतरित हिंदूंची घरवापसी घडवून आणल्याचे सांगितले. त्यांनी गोरमाटी भाषेत मनोगत व्यक्त केले. गजानन सोलकर यांनी अकोला जिल्ह्यातील ५३ पैकी ४१ गावांमध्ये घरवापसीचे कार्य केल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, ग्रंथपूजन व शस्त्रपूजनाने झाली. सचिव अॅड. हर्षदा पोरे यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. शैलेश भिडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. नारायण देशपांडे यांनी आभार मानले. विराज सवाई यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी डोंगरे यांनी सादर केलेल्या 'वंदे मातरम्'ने कार्यक्रमाची सांगता झाली.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories