सेंद्रीय पद्धतीने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती, वास्तुविशारद असलेल्या विद्या जगताप यांचा यशस्वी प्रयोग
Feb 18 2026
40
सेंद्रीय पद्धतीने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती, वास्तुविशारद असलेल्या विद्या जगताप यांचा यशस्वी प्रयोग
पिंपरी, ता. १८ - शेतीची आवड जोपासत वास्तुविशारद असलेल्या विद्या विठ्ठल जगताप यांनी सेंद्रीय पद्धतीने स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. हा सुंदर प्रयोग आहे पुरंदर तालुक्यातील आंबळे इथला. सन २०२५ पासून विद्या यांनी पाच गुंठ्यांत सुमारे ६०,००० रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. विद्या यांचा हा प्रयोग शेती करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.
शेतीमध्ये काहीतरी वेगळा प्रयोग करण्याच्या उद्देशाने विद्याताईंनी कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून त्यांनी स्ट्रॉबेरीची निवड केली. आंबळे येथे २२ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी पाच गुंठे क्षेत्रावर सुमारे १९०० स्ट्रॉबेरी रोपांची वाफ्यांमध्ये (बेड) शास्त्रीय पद्धतीने लागवड केली. ही रोपे वाई येथून आणली. एका रोपाची किंमत केवळ तीन रुपये होती. रोपांची लागवड करण्यापर्यंत अंदाजे १५,००० रुपयांचा खर्च आला आहे.
पुढे, या रोपांच्या उत्तम वाढीसाठी विद्याताईंनी शेणखत व गोशाळेत तयार केलेले जीवामृत दिले. आवश्यकतेनुसार ताक व गोमूत्राची फवारणी केली. रासायनिक खत किंवा कीटकनाशकांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करुन सुमारे ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. या रसरशीत स्ट्रॉबेरीजच्या विक्रीसाठी विद्याताईंनी व्हॉट्सपॲप मार्केटिंग केले आणि थेट ग्राहकांपर्यंत स्ट्रॉबेरी पोचविली. नातेवाईकांना विक्री केली व हळहळू ग्राहकसंख्या वाढत गेली आणि स्ट्रॉबेरीची शेत विद्याताईंनी यशस्वी करुन दाखवली. विद्याताई म्हणतात....''पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन सेंद्रिय शेती केल्यास ती अधिक गुणवत्तापूर्ण व फायदेशीर ठरेल.''
------------------------------------------------------------------------------