खरातच्या फार्महाऊसमधून २१ काडतुसे जप्त, शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु
पुणे, ता. २६ - भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासात वेगवेगळी माहिती उघड होत आहे. खराकडून जप्त केलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक प्रशासनाने दिल्याची माहिती पुढे आली. त्याच्या फार्महाऊसवर पोलिसांनी २१ काडतुसे जप्त केली आहेत. खरातचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली आहे. तपास यंत्रणांनी ही माहिती दिली आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या खरातच्या फार्महाउसमधून पोलिसांनी पिस्तूल जप्त केले. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अशोक खरातने जिल्हा प्रशासनाकडे रितसर अर्ज केला होता. १५ ऑक्टोबर २०१२ रोजी शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला होता व जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच हा परवाना त्याला देण्यात आला आहे. १ जानेवारी २०२४ रोजी या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याची नोंदही प्रशासनाच्या कागदपत्रांमध्ये आहे.
तपासात खरातच्या फार्महाऊसमधून २१ काडतुसे जप्त करण्यात आली. त्यापैकी पाच काडतुसे वापरलेली आहेत. ही काडतुसे नेमकी कशासाठी वापरण्यात आली याचा तपास सध्या सुरु आहे. पाच नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली आहे, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.