news
clock
नसरापूर व चाकण येथील बालकांवरील अत्याचाराचा संभाजी ब्रिगेडने केला तीव्र निषेध  .......  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

नसरापूर व चाकण येथील बालकांवरील अत्याचाराचा संभाजी ब्रिगेडने केला तीव्र निषेध ....... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

नसरापूर व चाकण येथील बालकांवरील अत्याचाराचा संभाजी ब्रिगेडने केला तीव्र निषेध  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

पिंपरी, ता. ४ - पुणे जिल्ह्यात घडलेल्या दोन अत्यंत धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, तर दुसरीकडे चाकण परिसरात बालकावर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनांचा तीव्र निषेध करत आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाईची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. त्यासाठी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निदर्शने सोमवारी (ता.४) केली.

संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सतीश काळे यांनी दोन्ही घटनांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, “राज्यात अशा प्रकारच्या अमानुष घटना सातत्याने घडत असताना सरकारकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत आहे.”

काळे यांनी राज्य सरकारवर थेट टीका करत या घटनांची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी आणि तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. “राज्यातील महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. केवळ आश्वासने देऊन चालणार नाही,तर प्रत्यक्षात कडक कायदेशीर कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

तसेच संबंधित दोन्ही प्रकरणांतील आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. पीडित कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत व मानसिक आधार द्यावा, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी, असेही ते म्हणाले.

या घटनांनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. सामाजिक संघटना व नागरिकांनी एकत्र येऊन कठोर कारवाईची मागणी लावून धरली आहे. प्रशासनाने या संतप्त भावना लक्षात घेऊन तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे सतिश काळे यांनी म्हटले आहे. त्या आंदोलनात संघाचे ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories